पारोळा – विकास कामांच्या बिल अदा करण्यासाठी व दुसऱ्या कामाची वर्क ऑर्डर काढून देण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच मागणी करण्यासह त्या मागणीस प्रोत्साहन देणाऱ्या एकुण ५ जणांविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर दत्ताजीराव शिंदे (गट विकास अधिकारी, पंचायत समिती, पारोळा), सुनील अमृत पाटील (विस्तार अधिकारी, पंचायत समिती, पारोळा), गणेश प्रभाकर पाटील (विस्तार अधिकारी, पंचायत समिती, पारोळा), अतुल पंढरीनाथ पाटील (वरिष्ठ लिपिक, पंचायत समिती, पारोळा), योगेश साहेबराव पाटील (कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंचायत समिती, पारोळा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.
यातील तक्रारदार यांनी दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ गावी पेव्हर ब्लॉक बसविणे व काँक्रिट रस्ता बनवण्याचे ७ लाखांचे व सावखेडा तुर्क गावातील रस्त्यांचे खडीकरण करण्याचे ६० लाखांचे ३ कामे व शासनाच्या ९०-१० हेडखाली ३० लाखांचे ३ अशी एकूण ९० लाखाचे ६ कामे घेतली होती. त्यापैकी सावखेडा होळ गावात केलेल्या कामांचे उर्वरित पैशाचे बिल व सावखेडा तुर्क गावात घेतलेल्या कामांची वर्क ऑर्डर काढून देण्याचे मोबदल्यात गट विकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे (पंचायत समिती पारोळा )यांनी फिर्यादीकडे २ लाख रुपये लाच रकमेची मागणी केली होती. त्यावेळी विस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील (पंचायत समिती पारोळा) यांनी फिर्यादीस २ लाख रुपये लाच रकमेपैकी ५० टक्के प्रमाणे १ लाख रुपये लाच रक्कम ऍडजस्ट करून सदर लाच रक्कम , गट विकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे यांना देण्यास प्रोत्साहन देवुन गट विकास अधिकारी दत्ताजीराव शिंदे, यांचे लाच मागणीस समर्थन दिले. तसेच विस्तार अधिकारी गणेश प्रभाकर पाटील ,वरिष्ठ लिपीक,अतुल पंढरीनाथ पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी योगेश साहेबराव पाटील (कंत्राटी) , यांनी सुद्धा फिर्यादी कडे स्वतः साठी व गट विकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे यांचे लाच मागणी प्रमाणे त्यांचे करिता २ टक्के प्रमाने २ लाख रुपये लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिले म्हणून त्यांच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन जि.जळगांव येथे लाच मागणी बाबत गुन्हा दाखल केला आहे .
विस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी योगेश साहेबराव पाटील यांना नमूद गटविकास अधिकारी यांच्यासाठी वर्क ऑर्डर काढून देतो म्हणून १ लाखाची लाच मागणी व स्वीकार केलेबाबत दि. २० सप्टेंबर रोजी पारोळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. सदरचे गुन्ह्यात दोन्ही जामीनावर मुक्त आहेत.
सदरची कारवाई उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पीएसआय दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी यांनी कारवाई केली आहे.