शहादा तालुका पत्रकार संघातर्फे आमदार पाडवी यांचा सत्कार ; मतदार संघाच्या विकासासाठी कटिबद्धची ग्वाही…
(नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : शहादा तालुका पत्रकार संघाच्या वतीने नवनिर्वाचित आमदार राजेश पाडवी यांचा सत्कार करण्यात आला. शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात आमदार राजेश पाडवी दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. विविध क्षेत्रातून नवनिर्वाचित आमदार राजेश पाडवी यांचा सन्मान करण्यात येत आहे. शहादा तालुका पत्रकार संघाच्या वतीनेही आमदार राजेश पाडवी हे दुसऱ्यांदा निवडून आल्याने त्यांचा सोमावल ता. तळोदा येथे त्यांच्या निवासस्थानी भेट दात सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी शहादा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. नेत्रदीपक कुवर, कार्याध्यक्ष प्रा. डी. सी. पाटील, उपाध्यक्ष हर्षल साळुंखे, कोषाध्यक्ष प्रा. ए. ए. खान, सचिव योगेश सावंत आदी उपस्थित होते. यावेळी सन्मानाला उत्तर देताना आमदार पाडवी म्हणाले की, शहादा तळोदा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून गेल्या पाच वर्षात शहादा शहरासह परिसराचा विकास साधण्याचा मी प्रयत्न केला आहे. अनेक विकासात्मक कामे केल्याने मतदार माझ्या पाठीशी उभा राहिल्याने उच्चांकी मताधिक्याने मतदारांनी मला पुन्हा एकदा आमदारपदाची संधी दिली आहे. येत्या पाच वर्षांमध्ये उर्वरित विकासकामांसह शहादा व तळोदा मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा मी प्रयत्न करेल. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवून राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.