खड्यात बैलगाडीचा ‘आख ‘ मोडला,यापुढे अनेक नागरिकांचे हात पाय मोडण्याची दाट शक्यता..
पोलीस स्टेशन समोरील घटना ,बांधकाम विभाग झाला आंधळा..
यावल दि.३ ( सुरेश पाटील )
यावल येथील पोलीस स्टेशन आणि ग्रामीण रुग्णालया समोरील सातोद रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमध्ये एका शेतकऱ्याच्या बैलगाडीचा ‘आख ‘ तुटल्याची घटना आज सोमवार दि.३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी घडली त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला यापुढे आता या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या अनेक नागरिकांचे हातपाय मोडले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
यावल येथील बुरुज चौकापासून,पोलीस स्टेशन समोर, ग्रामीण रुग्णालयासमोर,भारतीय स्टेट बँक,सेंट्रल बँक,तहसील कार्यालया समोरून जाणाऱ्या रस्त्यावर तालुक्यातील हजारो नागरिकांसह वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाहतूक आहे.या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे,निष्क्रियतेमुळे, रस्त्याची डागडूजी किंवा रस्त्याचे नवीन काम झाले नाही.त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या पोलीस स्टेशन मध्ये,खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात,सिटी सर्वे कार्यालयात, ग्रामीण रुग्णालयात,स्टेट बँक व सेंट्रल बँक,तहसील कार्यालय, शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना,नागरिकांना, वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण होत असला तरी मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग,संबंधित ठेकेदार पद्धतशीरपणे दुर्लक्ष करून आंधळ्याची भूमिका निभावत आहे,आज बैलगाडीचा ‘आख’ तुटला आहे आता यापुढे अनेक नागरिकांचे हातपाय मोडण्याची वाट पाहणार का..? तालुक्यात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यावल सातोद रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्याची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह लोकप्रतिनिधीनी करायला पाहिजे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहेत.