सेवा संकल्प अभियानांतर्गत मौजा भालोद येथे आदिवासी लाभार्थी भव्य मेळावा उत्साहात संपन्न..
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक स्वावलंबन हीच खरी प्रगती" - आमदार अमोल जावळे

यावल,( प्रतिनिधी )- आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती थेट उपलब्ध करून देणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने *सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी लाभार्थी भव्य मेळाव्याचे आयोजन मौजा भालोद, ता. यावल येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने करण्यात आले. या मेळाव्यास परिसरातील शेकडो आदिवासी बांधव व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अमोलदादा जावळे म्हणाले, _”कुटुंबाच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आदिवासी भागातील महिला बचत गटांनी केवळ बचतीपुरते मर्यादित न राहता विविध उत्पादन, प्रक्रिया उद्योग व व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी पुढाकार घ्यावा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल.”_महिला बचत गटांना फिरता निधीचे वितरण दि. १ जुलै २०२६ ते ३० जुलै २०२६या कालावधीत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांना प्रत्येकी *रु. १०,०००/- इतक्या फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले. यावेळी संबंधित बचत गटांना निधी वितरणाबाबत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
मेळाव्यामध्ये बचत गटांची स्थापना, बँक लिंकेज, विविध शासकीय योजना, आर्थिक सक्षमीकरण तसेच उद्योग- व्यवसायाच्या संधी याबाबत संबंधित विभागाच्या अधिकारी व प्रतिनिधींनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन, *संबंधित योजनांसाठी आवश्यक अर्ज व कागदपत्रे मेळाव्याच्या ठिकाणीच स्वीकारून घेण्यात आली. प्राप्त अर्जाची नियमानुसार छाननी व कार्यवाही करून पात्र लाभार्थ्यांना लवकरच संबंधित योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.आरोग्य विभाग व महसूल विभागाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच श्रीमती रेहाना जुम्मा तडवी यांनी महिला बचत गटांच्या वतीने मनोगत व्यक्त करून महिलांच्या विविध मागण्या व अडचणी मांडल्या.
उपस्थित मान्यवर:कार्यक्रमास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार,यावल च्या तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझिरकर, यावल पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी श्रीमती मंजुश्री गायकवाड यांच्या सह प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रवीण दाभाडे, पुरवठा विभागाचे चव्हाटे, संजय गांधी निराधार अनुदान योजना विभागाचे मनोज खारे, विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, भदाणे, ग्रामपंचायत अधिकारी जनार्दन पाटणकर तसेच आदिवासी विकास निरीक्षक ज्ञानेश्वर कुमावत, विश्वास गायकवाड, विकास पाटील, कृष्णा पाटील, विनोद पडोळे, प्रवीण भिमटे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आरोग्य सेवक व सेविका, अंगणवाडी सेविका तसेच विविध शासकीय विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.