अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहाद्यावर जलात्कार, शहर संपर्क क्षेत्राबाहेर..न्यायालय परिसरात पुन्हा पाणी..
पाण्याच्या प्रवाहात बालक गेला वाहून..
(नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : शहादा शहरासह परिसरात ढग फुटी सदृश पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एक वर्षाच्या काळानंतर पावसाने पुन्हा एकदा शहरावर जलात्कार केला. न्यायालयासह सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती आवार, बस स्थानक आणि नवीन वसाहतीत पाण्याने कहर केला.
त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण होवून शहर काही तासांसाठी संपर्क क्षेत्र बाहेर झाले होते. मागील वर्षी पाटबंधारे विभागाला न्यायालयाने याच कारणास्तव खडसावले असताना पालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने न्यायलयाच्या आदेशावर पाणी ओतुन अधिकाऱ्यांनी शहाराला पाण्यात डुबविले! आता तरी संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. गत काही दिवसांपासून शहादा परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती. त्यात काल मंगळवारी रात्रीच्या सुमारास सुमारे दिड तास ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने संपूर्ण शहर जलमय झाले. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पर्जन्य मापक यंत्रात 91.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. न्यायालय, पंचायत समिती, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी निवासस्थान, बसस्थानक, डोंगरगाव रोड, दोंडाईचा रोड तसेच सर्वच नवीन वसाहती आदी परिसरात पाणी साचल्याने सर्वत्र तलावाचे स्वरूप आले होते. शहराच्या उत्तरेकडे पडलेल्या पावसाचे पाणी शेतातून वाट मिळेल तसे आल्याने डोंगरगाव रस्त्यासह दोंडाईचा रोड, जुना मोहिदा रोडवर गुढगा एव्हढे पाणी वेगाने वाहत होते. संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. दुपारी तीन नंतर पाण्याचा प्रवाह कमी झाला व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
गोमाई नदीवरील कवळीथ बंधाऱ्यातील शेती सिंचनाच्या तीन पाटचाऱ्या शहरातून जातात. या पाटचाऱ्यांवर नागरिकांनी अनेक ठिकाणी अतिक्रमण करीत पक्के बांधकाम केले आहे. त्यामुळे लोणखेडा बायपास रस्त्याच्या अलीकडे पावसाचे पाणी वाट मिळेल तसे वाहत सुटते. त्यामुळे नवीन वसाहती जलमय झाल्या. तसेच हेच पाणी डोंगरगाव रस्त्यावर येत पश्चिम दिशेला वेगाने प्रवाहित झाले. त्यातून हे पाणी न्यायालयाच्या आवारात शिरले. मागील वर्षी असाच प्रकार झाला असता न्यायालयाने पालिका आणि पाटबंधारे विभागाला खडसावले होते. मात्र, पाटबंधारे विभाग, पालिकेसह प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे यावर्षी पुन्हा परिस्थिती जैसेथे झाली. आता तरी सामाजिक संघटनांनी एकत्र येत जनहित याचिका दाखल करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा दर वर्षी पावसाळ्यापूर्वी थातूरमातूर काम करण्याची सवय सुरूच राहील. आणि नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे भेंडवा नाल्याला पूर आला. काल रात्री भुलाने ता. शहादा येथील मनोज ठाकरे हे आपल्या दुचाकी गाडीने पत्नी व मुलासह मोहीदे येथे जात आसतांना तहसील कार्यालयाजवळील नाल्याच्या फरशीवरून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने नाल्यात पडले. त्यात त्यांचा सहा वर्षाचा मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. येथील फरशीची उंची वाढविण्याची अनेक दिवसांपासून मागणी आहे. तहसीलदारही याच मार्गाने कार्यालयात जातात परंतु बांधकाम विभागाने याकडे हेतुतः दुर्लक्ष केले आहे. जर या फरशीची उंची वाढलेली असती तर त्या बालकांचा असा अंत झाला नसता.
ईतर महत्वाच्या बातम्या
तांदलवाडी येथील तरुण अमेरिकेतील मोन्टाना येथे आठ दिवसांपासून बेपत्ता..
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न..