शहादा-तळोदा मतदार संघात 91 कोटींच्या विकास कामांना लवकरच सुरुवात- आमदार राजेश पाडवी..
नंदुरबार (जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शहादा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाने आदिवासी विभागातून 50 कोटी तर बिगर आदिवासी विभागातून 41 कोटी असा एकूण 91 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेश पाडवी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. शहादा विधानसभा मतदारसंघातील शहादा व तळोदा शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात विकासाचा अनुशेष असल्याने विकास कामे करण्यासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करून विकास कामांचे प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला होता व याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मंत्रिमंडळाने व राज्य शासनाने आमदार राजेश पाडवी यांनी सादर केलेल्या विकास कामांच्या प्रस्तावास मान्यता देत सुमारे 91 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात लवकरच विकास कामांना सुरुवात केली जाणार आहे. शासनाने विकास कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याने आमदार राजेश पाडवी यांनी शासनाचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.
या 91 कोटी रुपयांच्या निधीतून शहादा व तळोदा तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागात रस्त्यांचे डांबरीकरण व कॉंक्रिटीकरण, संरक्षक भिंतीची निर्मिती व नदी नाल्यांवरील पुलांची निर्मिती करण्यात येणार असून यामुळे दळणवळण सोपे होणार आहे. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शहादा शहरासाठी तीन कोटी व तळोदा शहरासाठी दोन कोटी रुपयांचा असा एकूण पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून यातून शहरी भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जाणार आहेत. गेल्या साडेचार वर्षाच्या कालावधीत संपूर्ण मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. तरी अनेक ठिकाणी आणखी काम करण्याची गरज आहे. यासाठी माझे प्रयत्न सुरू असून गोमाई नदीवर शहादा व तिखोरा या गावांना जोडणाऱ्या नवीन समांतर पुलाच्या निर्मितीचा प्रस्ताव आपण शासनाला सादर केला आहे. तसेच हायब्रीड ॲम्युनिटी अंतर्गत सुमारे 500 कोटी रुपयांचे दोन महत्त्वपूर्ण रस्त्यांचा प्रस्ताव आपण शासनाला सादर केला असून येत्या काही दिवसातच यावर निर्णय होऊन यास मान्यता मिळून निधीची तरतूद केली जाणार असल्याने या कामाचे भूमिपूजन सोहळा करून प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल. त्याचप्रमाणे शहादा शहरातील महत्त्वपूर्ण अशा डीपी रोडची निर्मिती करण्यासाठी 90 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. शहादा शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठीही शासनाची मंजुरी मिळाली आहे. येत्या काही दिवसात शहादा शहराच्या हद्दवाढीच्या प्रस्तावालाही शासनाची मान्यता मिळणार आहे. मतदारसंघातील बहुचर्चित रहाट्यावड धरणाचा प्रश्न मार्गी लागणार असून यासाठीही राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार आहे. लघुपाटबंधारे विभागामार्फत पिंगाणा, उंटावद, गोगापूर व दामळदा येथे नवीन बंधार्यांची निर्मिती करण्यासाठीच्या प्रस्तावास मान्यता राज्य शासन देणार असून या कामाची सुरुवात लवकरच केली जाईल, असेही आमदार राजेश पाडवी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या
रस्ते , पुलांसाठी व चांदसर शासकीय आश्रम शाळेसाठी 29.50 कोटीचा निधी मंजूर..
एसटी वाहकाने सुटे पैसे नसल्याने युवतीला अंधारात बसमधून उतरवले !
परळी शहरातील भीम नगर येथील विविध नागरी समस्या साठी 15 ऑगस्ट रोजी उपोषणास बसणार – बाळासाहेब जगतकर