‘सेवा संकल्प’ला विद्यार्थ्यांची साथ; स्वच्छता अभियानातून दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश..

यावल ( प्रतिनिधी ):- मेरा युवा भारत जळगाव, महर्षी व्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), यावल आणि नक्षत्र फाउंडेशन, शिरसाड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान सेवा पखवाडा’ अंतर्गत स्वच्छता अभियान व पथनाट्या द्वारे जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात यावल येथील महर्षी व्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. तसेच पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या युवा व खेळ मंत्रालया च्या अंतर्गत येणाऱ्या मेरा युवा भारत जळगावचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेकजी चावरे, महर्षी व्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी. बी. पाटील आणि नक्षत्र फाउंडेशन, शिरसाडचे सर्वेसर्वा तेजस धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच तालुका समन्वयक राजेश्री पाटील व कोमल इंगळे यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.
यावेळी प्राचार्य पी. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता तसेच सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना साठी योगदान देणाऱ्या सर्व विद्यार्थी,शिक्षक व सहकार्यांचे आभार कोमल इंगळे यांनी मानले. स्वच्छतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.