
बोदवड – पोलिस स्टेशन येथे गंभीर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत तीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात झालेल्या हलगर्जीपणामुळे अखेर खुनासारखा गंभीर गुन्हा घडल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली.
निलंबित करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी
1. सपोनि (API) दिपक सुरवडकर – पोलिस स्टेशन प्रभारी
2. एएसआय (ASI) रविंद्र गुरचल – टाऊन बिट प्रभारी
3. हेड कॉन्स्टेबल (HC) नंदकिशोर धनके
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
दि. १ मे २०२६ रोजी बोदवड पोलिस स्टेशन येथे CCTNS गुन्हा रजि. क्र. ००९६/२०२६ अंतर्गत BNS कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन्ही पक्षांमध्ये गंभीर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अदाखल गुन्हा क्रमांक ०२८०/२०२६ देखील नोंदविण्यात आला होता.
मात्र, वाढता तणाव आणि संभाव्य धोका लक्षात घेऊनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली नाही. परिणामी, दोन्ही गटांतील वाद अधिक चिघळत गेला आणि अखेर २१ मे २०२६ रोजी खुनाचा गंभीर प्रकार घडला.
हेड कॉन्स्टेबल धनके यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका
हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे दोन्ही पक्षांवर प्रतिबंधक कारवाई करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणतीही चौकशी किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना केली नाही. त्यामुळे वाद अधिक तीव्र होत गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एएसआय रविंद्र गुरचल यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात
टाऊन बिट प्रभारी म्हणून कार्यरत असलेले एएसआय रविंद्र गुरचल यांनी १९ मे रोजी घटनास्थळी भेट दिली होती. दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या वादाची पूर्ण माहिती असूनही त्यांनी केवळ दोन्ही पक्षांना पोलिस स्टेशनमध्ये आणून कोणतीही कायदेशीर कारवाई न करता सोडून दिल्याचे समोर आले आहे.
प्रभारी अधिकारी API दिपक सुरवडकर यांच्यावर गंभीर आरोप
वादाबाबत स्थानिक नगरसेवक आणि पोलिस कर्मचाऱ्यांकडून वारंवार माहिती मिळूनही सपोनि दिपक सुरवडकर यांनी कोणतीही तातडीची कारवाई केली नाही. तसेच वरिष्ठ कार्यालय किंवा नियंत्रण कक्षालाही वेळेत माहिती देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे बोदवड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विभागात मोठी खळबळ उडाली आहे.